मुंबई प्रतिनिधी
पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने खळबळ उडालेल्या कथित अन्नविषबाधा प्रकरणात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, ‘कॉज ऑफ डेथ – पेंडिंग’ अशी नोंद करण्यात आली आहे. परिणामी या प्रकरणातील गूढ अधिकच गडद झाले असून, तपासाचा केंद्रबिंदू आता फॉरेन्सिक अहवालावर येऊन ठेपला आहे.
डोकाडिया कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे ठोस कारण नमूद करण्यात आलेले नसल्याने विषबाधेचा निष्कर्ष अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नाही.
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, चारही मृतदेहांच्या तपासणीत कोणतेही स्पष्ट निष्कर्ष निघाले नसून, पुढील तपासासाठी अवयवांचे नमुने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील कारण निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येते. जेजे रुग्णालयातील तज्ज्ञांकडून या अहवालाचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडूनही कलिंगडाच्या नमुन्यांची तपासणी सुरू असून, त्यांचा अहवाल दोन दिवसांत अपेक्षित आहे. मात्र, निर्णायक ठरणारा फॉरेन्सिक अहवाल येण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस तपासात अद्याप कोणताही ठोस संशयास्पद मुद्दा समोर आलेला नसला तरी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर तपासादरम्यान एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. मृतांपैकी अब्दुल्ला डोकाडिया हे २०१९ मधील फसवणुकीच्या प्रकरणात साक्षीदार होते. जोगेश्वरी येथील एका विकासकाविरोधात दाखल झालेल्या तक्रारीत त्यांची साक्ष महत्त्वाची मानली जात होती. या प्रकरणाची सुनावणी २०२६ मध्ये होणार असल्याची नोंद आहे.
या सर्व घडामोडींमुळे मृत्यूमागील कारणाबाबत विविध शक्यता व्यक्त होत असल्या, तरी अधिकृत निष्कर्ष फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत या प्रकरणातील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.


