मुंबई प्रतिनिधी
बच्चू कडू यांनी अखेर आपला ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करत पक्षप्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीत कडू यांनी धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाल सुरू झाल्याचे मानले जात आहे.
कडू हे एकेकाळी शिवसेनेशी निगडित होते. मात्र, त्यांनी पुढे वेगळी राजकीय वाट निवडत ‘प्रहार’च्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. आता पुन्हा शिवसेनेत दाखल होत त्यांनी ‘घरवापसी’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना कडू म्हणाले, “हा निर्णय केवळ आमदारकीसाठी किंवा पदासाठी नाही. राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी लढा अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही हा मार्ग स्वीकारला आहे. आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा बदललेला नाही.” त्यांनी कामगार आणि शेतकरी प्रश्नांवर अधिक ताकदीने भूमिका मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ हा शिवसेनेत विलीन करण्यात आला असला तरी ‘प्रहार’ ही सामाजिक संघटना स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. या निर्णयामुळे कडू यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्या राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडू यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


