मुंबई, प्रतिनिधी
एप्रिलच्या अखेरीसच राज्यात उन्हाने विक्राळ रूप धारण केले असून, महानगरांसह विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून, अकोला व अमरावती येथे पारा तब्बल ४५.६ अंश सेल्सिअसपर्यंत झेपावला आहे. वाढती आर्द्रता आणि प्रखर उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघाताचा धोका वाढला आहे.
महामुंबईत उकाड्याची कोंडी
राजधानी मुंबईसह महानगर प्रदेशात शनिवारी उष्णतेने उच्चांक गाठला. रायगड जिल्ह्यातील बिरवाडी येथे सर्वाधिक ४५.१ अंश तापमानाची नोंद झाली, तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ४३.८ अंशांपर्यंत पारा पोहोचला.
मुंबई शहरात विक्रोळी येथे ३९.३ अंश तापमानासह सर्वाधिक उष्णता जाणवली. राम मंदिर परिसरात ३८.५ अंश, वांद्रे येथे ३७.२ अंश आणि विद्याविहारमध्ये ३६.१ अंश तापमानाची नोंद झाली. दहिसर आणि चेंबूरमध्येही पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने उपनगरांतील नागरिक अक्षरशः घामाघूम झाले.
विदर्भात उष्णतेचा कहर
विदर्भात गेल्या २४ तासांत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. नागपूरमध्ये तापमान ४४.२ अंशांवर पोहोचले असून, शहर पुन्हा ‘हॉट’ झोनमध्ये गेले आहे. एप्रिल महिन्यातच ४५ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने, यंदा उष्णतेचे जुने विक्रम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी २०१६, २०१७, २०१८ आणि २०२२ या वर्षांत एप्रिलच्या अखेरीस नागपूरचे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले होते. यंदाही तसाच कल दिसत असल्याने हवामान तज्ज्ञ चिंतित आहेत.
उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम
हवामान विभागाने विदर्भासह राज्यातील अनेक भागांत पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. सध्याचे कोरडे व उष्ण वातावरण तापमान वाढीस पोषक ठरत असून, पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यातही चाळिशी पार
पुण्यातही तापमानाने ४० अंशांची मर्यादा ओलांडली असून, शहरात ४०.९ अंश तापमानाची नोंद झाली. लोहगाव परिसरात तर पारा ४२ अंशांवर गेला. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाडा अधिकच जाणवत आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आरोग्याचा इशारा : खबरदारी अत्यावश्यक
उष्णतेच्या तीव्रतेमुळे उष्माघात व डिहायड्रेशनचा धोका वाढला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सूती कपडे परिधान करावेत, तसेच डोक्यावर संरक्षण ठेवावे, असा सल्ला दिला आहे.
एकंदरीत, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, मे महिन्याच्या प्रारंभीच उष्णतेचा कडेलोट होण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे, हीच काळाची गरज ठरत आहे.


