मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दोन्ही मतदारसंघांतील एकूण ३ लाख ८४ हजारांहून अधिक मतदार ४७८ मतदान केंद्रांवर आपला लोकशाही हक्क बजावणार आहेत.
बारामती मतदारसंघातील जागा राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. तर राहुरीतील भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघांतील राजकीय समीकरणांकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार रिंगणात असून, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न झाले होते. काँग्रेसने उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली होती; मात्र अखेर अर्ज मागे घेण्यात आल्याने येथे प्रत्यक्ष लढत टळली असली, तरी औपचारिक मतदान होत आहे. मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून मतदानाचा हक्क बजावण्याचा कार्यक्रम आखला आहे.
राहुरीत मात्र खरी लढत रंगणार असून, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात थेट सामना होत आहे. या मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना (ठाकरे गट) समर्थित अपक्ष रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारही लढतीत असल्याने बहुकोनी सामना निर्माण झाला आहे.
राहुरी मतदारसंघात एकूण ३ लाख ३३ हजार ५४३ मतदार असून, ३७४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सुमारे २,१८० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांच्या समर्थकांची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या पोटनिवडणुकांची अधिसूचना ३० मार्च रोजी जारी करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिल होती, तर ७ एप्रिल रोजी अर्जांची छाननी झाली. ९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मतदानानंतर ४ मे रोजी मतमोजणी होणार असून, ६ मेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
दोन्ही मतदारसंघांतील निकालांकडे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले असून, विशेषत: राहुरीतील चुरशीची लढत राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


