मुंबई प्रतिनिधी
पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांची काल बुधवारी स्थानिक आमदार वरुन सरदेसाई यांनी भेट घेऊन वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण व उन्नतीकरणाच्या प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. या कामासाठी आमदार निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आलेली असतानाही आवश्यक परवानग्यांअभावी प्रकल्प रखडल्याची बाब या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
वांद्रे (पूर्व) स्थानक परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. यासंदर्भात यापूर्वी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. लवकरच रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित परवानग्या मार्गी लावण्यासह प्रकल्पाला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, वांद्रे (पूर्व) परिसरातील रेल्वे हद्दीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या स्थानिक रहिवाशांना देण्यात येत असलेल्या निष्कासन नोटिसांचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. या कारवाईमुळे संबंधित कुटुंबांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेता, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावा, अशी विनंती करण्यात आली. तसेच पर्यायी व्यवस्था सुनिश्चित होईपर्यंत निष्कासनाची कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्याची मागणी करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक समन्वय साधण्याचे संकेत दिल्याचे समजते. परिणामी, वांद्रे (पूर्व) स्थानक परिसराच्या विकासासोबतच स्थानिक रहिवाशांच्या प्रश्नांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


