मुंबई प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या अत्यंत वर्दळीच्या स्थानकावर मंगळवारी सकाळी दोन उपनगरी लोकल गाड्या एकाच मार्गावर समोरासमोर येण्याची धक्कादायक घटना घडली. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला असला, तरी या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
BLUNDER! Two local trains on the same track on Central Railway at #Mumbai CSMT.
A Central Railway spokesperson confirmed the incident and said they are investigating the matter.
A train coming from Badlapur was taken on PF 5 instead of PF 4 which was occupied by another local.… pic.twitter.com/cQxfAJU8pM
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) April 21, 2026
प्राथमिक माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आधीच एक लोकल उभी असताना दुसरी लोकल त्याच मार्गावर आणली गेली. सिग्नल यंत्रणेत झालेल्या त्रुटीमुळे संबंधित गाडी प्लॅटफॉर्म ४ ऐवजी ५ कडे वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. समोर उभी असलेली गाडी लक्षात येताच मोटरमनने तात्काळ ब्रेक लावत गाडी थांबवली. काही क्षणांचा विलंब झाला असता तर मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित स्टेशन मास्तरला तत्काळ निलंबित केले आहे. सिग्नल नियोजनातील चूक आणि समन्वयाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अधिक चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेचा परिणाम उपनगरी वाहतुकीवरही झाला. मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन ते सीएसएमटी दरम्यान लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. कल्याणहून येणाऱ्या जलद लोकलना मार्गातच थांबवण्यात आले. परिणामी, सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. काही गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याचेही निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, याच पार्श्वभूमीवर सोमवारी डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे एका लोकलचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. त्यामुळे उपनगरी वाहतुकीत मोठा खोळंबा झाला होता. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, रेल्वेच्या देखभाल व सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबईची ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वे सेवेमधील अशा घटना चिंताजनक असून, तांत्रिक यंत्रणा, सिग्नल प्रणाली आणि मानवी समन्वय यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.


