मुंबई प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतील मौलाना शौकत अली मार्ग परिसरात पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाने सोमवारी धडक मोहीम राबवून जुने फर्निचर विक्रेते आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई केली. या कारवाईमुळे नागरिकांसाठी पदपथ मोकळे करण्यात आले असून वाहतुकीलाही दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या परिमंडळ १ च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. मुरली देवरा नेत्र रुग्णालय ते जे. जे. रुग्णालय सिग्नलदरम्यानच्या पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते आणि अपघाताचा धोका वाढला होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘ई’ विभागाच्या परिरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुंबई पोलीस यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई केली. या मोहिमेत पदपथांवर पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने हटवून त्यांचा तत्काळ निपटारा करण्यात आला. तसेच परिसरातील सर्व अनधिकृत फेरीवाल्यांनाही हटविण्यात आले.
दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांविरोधातील कारवाया यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ‘ई’ विभागाने स्पष्ट केले आहे.


