
नाशिक:प्रतिनिधी
पावाच्या किमती वाढविणे अनिवार्य असल्याने सांगत शनिवार (ता. २५) पासून दरवाढ करण्याचा निर्णय नाशिक बेकरी असोसिएशनने घेतला आहे. साधारणतः १५ ते २० टक्के दरवाढ होणार असल्याची घोषणा संघटना पदाधिकाऱ्यांनी काशीमाळी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर केली आहे.
त्यामुळे आता मिसळ, पावभाजीवर ताव मारताना अधिकचा खिसा हलका करावा लागण्याची शक्यता आहे.
नाशिक बेकरी असोसिएशनतर्फे जारी केलेल्या माहितीनुसार पावाच्या किमतीत शनिवार (ता. २५) पासून १५ ते २० टक्के दरवाढ केली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढती महागाई, कच्च्या मालाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, इंधन खर्च, मजुरीत झालेली वाढ यामुळे बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पाव उत्पादन करताना बेकरी व्यावसायिकांना प्रसंगी आर्थिक झळ सोसत व्यवसाय करावा लागतो.
राज्यभरात इतरत्र पावाच्या किमतीत वाढ झाली असताना नाशिकमधील बेकरी उत्पादकांनी ग्राहकांसाठी जुने दर कायम ठेवले होते. मात्र, मैदा, तेल, इंधन, आणि मजुरीच्या किमतींमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन दरवाढ करणे अनिवार्य झाले आहे. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन पुढेही दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू, असे संघटनेतर्फे स्पष्ट केले आहे. या वेळी राहुल शिंदे, फैयाज खान, मोबिन खान, दीपक काळे, काले खान, युनूस खान, माजीद खान, संकेत जाधव आदी उपस्थित होते.