सातारा प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालयात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील शिपाई आनंदा गोपाळ वाळवेकर (वय ४८) यास ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या भागीदारीत असलेल्या खासगी रुग्णालयात ‘सोनोग्राफी सेंटर’, शासनमान्य गर्भपात केंद्र तसेच कुटुंब नियोजन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. संबंधित प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे प्रलंबित होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने तक्रारदाराने रुग्णालयातील शिपाई वाळवेकर याची भेट घेतली. वाळवेकर हा निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या कार्यालयात कार्यरत होता. प्रस्तावाला मंजुरी मिळवून देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. विभागाने प्राथमिक पडताळणी केली असता लाच मागितल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून शुक्रवारी कारवाई केली. यावेळी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना वाळवेकर यास रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.


