सातारा प्रतिनिधी
सातारा:अवघ्या बारा दिवसांपूर्वी प्रेमविवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी घातपाताचा आरोप करत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संबंधित परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाग्यश्री संजय मोटे (वय २१, मूळ रा. पांढरेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली; सध्या रा. विकासनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. राजकुमार लालासो कांबळे (वय २५, मूळ रा. पुळकोटी, ता. माण, जि. सातारा; सध्या रा. विकासनगर) याच्याशी तिने ३० मार्च रोजी प्रेमविवाह केला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३० मार्च रोजी भाग्यश्री बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्याच दिवशी तिने राजकुमार कांबळे याच्यासोबत विवाह केल्याचे उघड झाले. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेदरम्यान कांबळे कुटुंबीयांकडून हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप मोटे कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, १२ एप्रिल रोजी राजकुमार कांबळे याने मोटे कुटुंबीयांशी संपर्क साधून भाग्यश्रीला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच कुटुंबीय तातडीने साताऱ्यात दाखल झाले. मात्र, ते रुग्णालयात पोहोचताच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून हुंड्यासाठी झालेल्या छळातूनच घातपात झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर पती राजकुमार कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर विकासनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून, तपासाअंती या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.


