बीड प्रतिनिधी
परळी येथील रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. नितीन पंडित ढगे (वय अंदाजे ३५) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास माधव बाग परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. काही काळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून ढगे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, सुसाईड नोट सापडली आहे की नाही, याबाबतही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणाला अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे परळी शहरासह लोहारा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सखोल चौकशीची मागणी होत आहे. पोलीस दलातील वाढता ताणतणाव आणि अंतर्गत व्यवस्थापनाच्या प्रश्नांकडेही या घटनेनंतर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.


