बीड प्रतिनिधी
प्रशासनात तडफदार, तत्वनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा आपल्या वैचारिक भूमिकेची झलक दाखवत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. आईच्या निधनानंतर पारंपरिक दहावा-तेरवा आणि नदीत अस्थी विसर्जन यांसारख्या रूढ प्रथांना फाटा देत त्यांनी विज्ञाननिष्ठ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने आईला श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या या निर्णयाची राज्यभर चर्चा होत असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात कौतुक व्यक्त होत आहे.
अलीकडेच राज्य शासनाने तुकाराम मुंढे यांची बदली करून त्यांची नियुक्ती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण विभागाच्या सचिवपदी केली आहे. त्यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागातही त्यांनी कर्तव्यदक्ष प्रशासनाची छाप उमटवली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची दु:खद बातमी मिळाल्यानंतर त्यांनी आपला पश्चिम बंगालचा अधिकृत दौरा तातडीने रद्द केला आणि बीड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी, ताडसोना येथे धाव घेतली.
गावी पोहोचल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यानंतर पारंपरिक पद्धतीने दहावा, तेरावा, अस्थी विसर्जन अशा धार्मिक विधी करण्याऐवजी मुंढे कुटुंबीयांनी एक वेगळी, विवेकवादी आणि पर्यावरणपूरक वाट निवडली.
अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण
आईच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी सर्व विधी पूर्ण करून अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी कुटुंबाच्या शेतात खड्डा खोदून त्या विसर्जित करण्यात आल्या. त्याच ठिकाणी वडाचे झाड लावून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भावनिक आणि विचारपूर्वक असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांनी लिहिले की, “आमच्या ‘बाईंच्या’ स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडण्याचा संवेदनशील व विवेकवादी निर्णय घेतला आहे. निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खरी श्रद्धांजली आहे.”
त्यांनी पुढे म्हटले आहे की, “आईच्या अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी त्या आमच्या शेतात विसर्जित करून त्या ठिकाणी वडाचे झाड लावले आहे. आमच्या ‘बाईंची’ माया सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहावी, हा त्यामागचा हेतू आहे. हा वटवृक्ष आमच्या ‘जीजींच्या’ आशीर्वादाचे प्रतीक ठरेल.”
दहावा-तेरवा करण्यास नकार
परंपरेप्रमाणे मृत्यूनंतर दहावा आणि तेरावा असे विधी केले जातात. मात्र मुंढे कुटुंबाने तेही न करण्याचा निर्णय घेतला. यामागील कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक युगात विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारणे आवश्यक आहे.
“आम्ही कोणत्याही प्रकारचा दहावा किंवा तेरवा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरत सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिले आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि समाजहिताचा विचार करणे हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसे ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘बाई’ आणि ‘जीजी’ म्हणून ओळख
मुंढे यांनी आपल्या आईविषयीच्या आठवणी सांगताना भावनिक होत एक उल्लेख केला. ते म्हणाले की, “आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला ‘बाई’ म्हणून संबोधित असू. तर गावकरी आणि आप्तेष्टांसाठी त्या ‘जीजी’ म्हणून ओळखल्या जात.” त्यामुळे लावण्यात आलेला वटवृक्ष हा केवळ स्मृतीचिन्ह नसून त्यांच्या मायेची सावली कायम राहण्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
परंपरेला पर्याय देत विज्ञाननिष्ठ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने आईला श्रद्धांजली अर्पण केल्याबद्दल तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. अनेकांनी हा निर्णय समाजासाठी आदर्श ठरू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रूढींना फाटा देण्याचे धाडस दाखवणाऱ्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंढे यांच्या विचारांची आणि व्यक्तिमत्त्वाची चर्चा राज्यभर रंगली आहे.


