बीड प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याने त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी समोर आलेल्या दृश्यांनी कराडच्या सध्याच्या अवस्थेची झलक उघड केली असून, प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे.
रुग्णालयात नेण्यात येत असताना कराडची अवस्था अत्यंत अशक्त दिसून येत होती. पांढरे पडलेले केस, अनवाणी पाय, खांद्यावर टाकलेला रुमाल आणि हातात बांधलेली दोरी, या स्वरूपात त्याला आणण्यात आल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तुरुंगातील त्याच्या स्थितीबाबत आतापर्यंत मर्यादित माहिती समोर येत असताना, या घटनेमुळे त्याची प्रत्यक्ष अवस्था सार्वजनिक झाली आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत वाल्मिक कराड हा या कटाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, विशेष मकोका न्यायालयाने कराड आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. सध्या साक्षीदारांच्या साक्षीची प्रक्रिया सुरू होण्याच्या टप्प्यावर प्रकरण आहे.
दरम्यान, कराडला पोटदुखीची तक्रार जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून, डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच कराडचे समर्थकही बाहेर मोठ्या संख्येने जमल्याचे दिसून आले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिणामही लक्षणीय ठरले होते. वाल्मिक कराडशी संबंधित आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा मंत्रिपदासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती.
न्यायालयीन प्रक्रियेतही कराडला मोठा दिलासा मिळालेला नाही. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, तिन्ही स्तरांवर त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सध्या मुख्य आरोपीसह एकूण पाच जण कोठडीत असून, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. तो काही दिवसांपूर्वी बीडमध्ये आल्याचा आरोप मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता.
प्रकरणाला जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले असताना, आता न्यायालयीन सुनावणी निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. साक्षीदारांच्या साक्षीनंतर पुढील प्रक्रिया गती घेण्याची शक्यता असून, या बहुचर्चित प्रकरणातील अंतिम निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


