बीड प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले. बीड आणि पुणे यांच्यातील पहिल्या थेट दैनंदिन रेल्वेसेवेचा गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनानंतर विशेष रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे बीडसह मराठवाड्याच्या पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी असलेल्या रेल्वे संपर्काला नवी जोड मिळाली आहे.

बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू होणे हा जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर आता त्याच दिवशी बीडहून थेट पुण्यापर्यंत रेल्वे धावू लागली आहे. बीड-पुणे रेल्वेसेवेची घोषणा करताना सुनेत्रा पवार यांनी मराठवाडा मुक्ती दिनाचा मुहूर्त साधून सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज ही सेवा प्रत्यक्षात आली.
या उद्घाटनपर विशेष रेल्वेचा क्रमांक ०१४०१ असून ती बीडहून पुण्याच्या दिशेने धावली. या मार्गावर अमळनेर भंड्याचे, न्यू आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. नियमित सेवा सुरू झाल्यानंतर बीड-पुणे मार्गावर दररोज रेल्वे उपलब्ध होणार आहे. पुणे-बीड प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा राहणार असल्याचे रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या रेल्वेसेवेचा सर्वाधिक फायदा विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण, शेतकरी, भाविक तसेच पुणे आणि परिसरात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण, रोजगार, वैद्यकीय उपचार, व्यापार आणि इतर कामांसाठी पुण्याकडे जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी रेल्वेचा थेट पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील व्यापार आणि आर्थिक व्यवहारांना या रेल्वे जोडणीमुळे चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पातील अहिल्यानगर-बीड विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर बीड-पुणे रेल्वेसेवेचा हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याची रेल्वे जोडणी केवळ अहिल्यानगरपुरती मर्यादित न राहता पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराशी थेट जोडली गेली आहे. या जोडणीमुळे भविष्यात जिल्ह्यातील औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटनविषयक हालचालींना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
उद्घाटनप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी बीड रेल्वे प्रकल्पाच्या पाठपुराव्याचा उल्लेख करत दिवंगत अजित पवार यांच्या प्रयत्नांची आठवण करून दिली. गेल्या वर्षी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू करताना पुढील टप्प्यात बीडहून थेट पुण्याला रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्याचा शब्द देण्यात आला होता. तो शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बीडची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीड-पुणे सेवेनंतर बीडची मुंबईशी थेट रेल्वे जोडणी करण्याच्या हालचालीही सुरू आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत बीड-मुंबई (पनवेल) रेल्वेसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बीड-पुणे सेवेनंतर मुंबईशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित झाल्यास जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बीड-पुणे रेल्वेसेवेमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला पूर्णविराम मिळाला असून, बीडच्या विकासाच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. रेल्वे स्थानकावर उद्घाटन सोहळ्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीडला पुणे आणि पुढे मुंबईशी जोडणाऱ्या रेल्वे सेवांच्या विस्तारामुळे मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

