वर्धा प्रतिनिधी
विदर्भात एप्रिलच्या मध्यातच उन्हाची तीव्रता धोकादायक पातळीवर पोहोचली असून वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा प्रचंड तडाखा बसत आहे. तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, गुरुवार, १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश काढत उष्णतेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क भूमिका घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने चढत असून अनेक ठिकाणी तो ४० अंशांच्या पुढे गेला आहे. अकोला येथे ४४.२ अंश, अमरावती ४४.० अंश, तर नागपूरमध्ये ४३.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वर्ध्यातही पारा ४३.९ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना उष्णतेचा तीव्र फटका बसत आहे.
हवामान विभागाने वर्ध्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत उष्णलाटेची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना उष्णतेचा अधिक त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन अंगणवाडी केंद्रेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा प्रशासनालाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कपडा वापरावा तसेच हलके आणि सैल कपडे परिधान करावेत, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट कायम आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे, भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार वर्धा जिल्ह्यात उष्णलाटेची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत असून, उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.


