नंदुरबार प्रतिनिधी
भाजीपाला वाहतुकीच्या आड जिवंत वन्यजीवांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ५ कोल्हे आणि २८९ पक्ष्यांची सुटका करण्यात आली. या कारवाईत सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयास्पद वाहनाची हालचाल लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी मोहीम राबवली. भाजीपाला वाहतूक असल्याचे सांगत असलेल्या वाहनाची झडती घेतली असता कॅरेटमध्ये जिवंत प्राणी व पक्षी लपवून ठेवलेले आढळले. या घटनेने तपास पथकही स्तब्ध झाले.
वाहनातील चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे शहजाद अहमद अतिक अहमद (वय ४७), मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक (वय ३२) आणि शेख सोहेल शेख अफजल कुरेशी (वय २४) अशी सांगितली. हे तिघेही नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
सखोल चौकशीत आरोपींनी मालेगाव येथील काही व्यक्तींनी ही वन्यजीवांची खेप गुजरातमधील बडोदा येथे पोहोचवण्याचे काम दिल्याची कबुली दिली. वाहनातून जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये ५ कोल्हे, ९९ अलेक्झांड्रीन जातीचे हिरवे पोपट आणि १९० तितर पक्षी यांचा समावेश आहे. हे सर्व प्राणी व पक्षी जिवंत अवस्थेत आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांना तातडीने वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी व पुढील संरक्षणात्मक प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव तस्करीच्या या साखळीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. या धाडसी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, वन्यजीवांची अवैध तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.


