रणजित मस्के : प्रतिनिधी
सातारा : मारहाण करून बुलेट आणि अन्य साहित्य लुटणाऱ्या आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी शशिकांत रामचंद्र गोरे (वय ३१, रा. मेढा ता. जावली, जि. सातारा) यांनी कोंडवे परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथे अज्ञात आरोपींनी मारहाण करून त्यांची बुलेट दुचाकी, मोबाईल चार्जर आणि इतर साहित्य जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार डीबी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंडवे येथून दोन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून बुलेट दुचाकीसह मोबाईल चार्जर व अन्य साहित्य असा सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करत आहेत.
या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
सपोनि सुदर्शन काटकर, सपोनि अन्वर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस हवालदार मनोज गायकवाड, पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, पोलीस हवालदार राजू शिखरे, महिला पोलीस हवालदार विद्या कुंभार, महिला पोलीस हवालदार तेजा तुपे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन झनकर.
दरम्यान, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.


