पुणे प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर यश मिळवता येते, याचा प्रत्यय कोंढवे-धावडे येथील आकाश जाधवच्या यशातून पुन्हा एकदा आला आहे. गेली तब्बल १२ वर्षे शिक्षणासोबत वृत्तपत्रे टाकण्याचे काम करणाऱ्या आकाशची पुणे शहर पोलिस दलात हवालदारपदी निवड झाली असून परिसरात त्याच्या यशाचा अभिमानाने उल्लेख केला जात आहे.
आकाशचे कुटुंब अत्यंत साध्या परिस्थितीत जीवन जगत आहे. आई-वडील मजुरी व गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही आकाशने शिक्षण सोडले नाही. उलट, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्धार करत त्याने लहानपणापासूनच वृत्तपत्र वितरणाचे काम स्वीकारले. पहाटेच्या वेळी वृत्तपत्रे टाकून तो नियमितपणे अभ्यासाला वेळ देत होता.
पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून आकाशने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मात्र, पहिल्या तीन प्रयत्नांत त्याला अपयशाचा सामना करावा लागला. तरीही खचून न जाता त्याने आपल्या तयारीत सातत्य ठेवले. प्रत्येक अपयशातून शिकत त्याने मेहनत अधिक वाढवली आणि अखेर चौथ्या प्रयत्नात त्याचे स्वप्न साकार झाले. या यशामुळे केवळ त्याच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे.
आकाशच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग मोठा असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. मुलाच्या यशाने त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आकाशचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेवक अनिता इंगळे, नगरसेवक काकासाहेब चव्हाण, अतुल धावडे, अमोल परांडे, अविनाश सरोदे, अक्षय गायकवाड, हरिभाऊ राठोड, राजाभाऊ राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकाश जाधवची ही प्रेरणादायी यशोगाथा संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरत असून, ‘जिद्द असेल तर यश निश्चित’ हा संदेश पुन्हा अधोरेखित करत आहे.


