पुणे प्रतिनिधी
राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप झपाट्याने वाढत असून काही जिल्हे ‘अति-उच्च उष्णता धोका’ (रेड झोन) श्रेणीत जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, तर अनेक जिल्हे ‘उच्च जोखीम’ (ऑरेंज झोन) मध्ये दाखल झाले आहेत. ‘कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर’ (CEEW) या संस्थेने याबाबत इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्हे तसेच अकोला, अमरावती आणि वर्धा येथे गुरुवारी (ता. १६) ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
तापमानाचा चढता पारा
विदर्भात अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथेही तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
मध्य महाराष्ट्रात लोहगाव, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा आणि सोलापूर येथे कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.
मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड येथे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
पुढील चार दिवसांचा अंदाज
• कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा : कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ
• विदर्भ : पुढील ४८ तासांत २ ते ३ अंशांनी वाढ
• हवामान स्थिती : बहुतांश भागात कोरडे वातावरण
• कोकण किनारपट्टी (पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) : उष्ण व दमट हवामान
उष्णतेची कारणमीमांसा
कर्नाटक आणि महाराष्ट्रालगतच्या समुद्रसपाटीवरील मधल्या वातावरणीय थरात निर्माण झालेल्या प्रति-चक्रीय स्थितीमुळे (ॲन्टी-सायक्लोन) उष्णतेची तीव्रता वाढत आहे. उत्तर कर्नाटकावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने उष्ण हवेचा साठा वाढून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे.
विभागनिहाय उष्णतेची लाट
• विदर्भ : १५ ते १९ एप्रिल – तीव्र उष्णतेची लाट
• मध्य महाराष्ट्र : १५ ते १८ एप्रिल – उष्णतेचा प्रकोप
• मराठवाडा : १६ ते १८ एप्रिल – उष्णतेची लाट
पुणे जिल्ह्यात चाळीशीपार
पुणे शहर व परिसरातही तापमानाने चाळीशीचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बुधवारी (ता. १५) नोंदलेली तापमाने पुढीलप्रमाणे
• शिवाजीनगर : ३९.२°C
• कोरेगाव पार्क : ३९.३°C
• मगरपट्टा : ३९.६°C
• हडपसर : ३८.५°C
• वडगाव शेरी : ३८.८°C
• चिंचवड : ३८.७°C
जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिस्थिती अधिक तीव्र असून
• पुरंदर : ४०.४°C
• लवळे : ४०.४°C
• बारामती : ४०.२°C
दरम्यान, पुणे व आसपासच्या भागात गुरुवार ते शनिवार (१६ ते १८ एप्रिल) दरम्यान कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागरिकांसाठी सूचना
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि वृद्ध, लहान मुले व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


