रणजित मस्के : प्रतिनिधी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत स्कॉर्पिओ गाडीतून बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. या कारवाईत सुमारे २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहादल बाबा चौक परिसरात तपास पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई भिमराव कांबळे व अमोल वायाळ यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काळ्या रंगाची एमएच-१४ एलपी ७४७४ क्रमांकाची स्कॉर्पिओ नगर रोडच्या दिशेने विदेशी दारूची अवैध वाहतूक करत आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित वाहन अडवले.
वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अंग्रेजसिंग पुरणसिंग गील (वय ३८, रा. बोपखेल, पुणे) असे सांगितले. गाडीची झडती घेतली असता डिकीमध्ये विविध ब्रँडची सुमारे २ लाख रुपयांची विदेशी दारू आढळून आली. तसेच स्कॉर्पिओ वाहन व मोबाईलसह एकूण २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत आणि सह पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वपोनि रविंद्र कदम, पो.नि. (गुन्हे) उमेश गित्ते, सपोनि मिथुन सावंत, सपोनि रविकांत नंदनवार, पो.शि. भिमराव कांबळे, अमोल वायाळ, दत्तात्रय शिंदे, सुरज ओंबासे, अमोल गायकवाड, कादिर शेख, राहुल परदेशी, अतुल जाधव, उगले यांनी सहभाग घेतला.


