प्रतिनिधी, स्वप्नील गाडे
मुंबई : वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसरात सोमवारी दुपारी सुरक्षा रक्षकाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मृत व्यक्तीचे नाव अभिनव चौधरी (५६) असे असून ते बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी होते. ते एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ते ड्युटीवर असताना ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने चौधरी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांच्या मानेवर व हातांवर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल कॉलला प्रतिसाद न दिल्याच्या कारणावरून आरोपीने चौधरी यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना खेरवाडीतील म्हाडा कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आरोपीला अटक करण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.


