नागपूर प्रतिनिधी
नागपूर : अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्यांचा धक्कादायक नमुना नागपुरात उघडकीस आला आहे. शॅम्पूच्या साध्या बाटल्यांमध्ये कोकेन लपवून राजधानी एक्सप्रेसमधून वाहतूक केली जात असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटच्या कारवाईत स्पष्ट झाले. या प्रकरणात सुमारे ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ४ कोटी २६ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे डीआरआयने हजरत निजामुद्दीन–केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसवर लक्ष ठेवले होते. दिल्लीहून बेंगळुरूकडे प्रवास करणाऱ्या एका महिलेबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार नागपूर स्थानकावर सापळा रचण्यात आला. गाडी आल्यानंतर संशयित महिलेवर नजर ठेवण्यात आली आणि पुढे अजनी स्थानकावर तिला ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासणीदरम्यान महिलेच्या सामानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र कपड्यांमध्ये ठेवलेल्या दोन शॅम्पूच्या बाटल्यांवर अधिकाऱ्यांना संशय आला. तपासणी केल्यावर त्या बाटल्यांतील द्रव काढून टाकण्यात आला असता त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या ५० सीलबंद कॅप्सूल्स आढळल्या. या कॅप्सूल्समध्ये पांढऱ्या रंगाचे कोकेन अत्यंत कौशल्याने लपवण्यात आले होते.
फील्ड ड्रग टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यानंतर संबंधित पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. एकूण ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी महिलेविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस), १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणामागे मोठे आंतरराज्य तस्करी जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अटक केलेल्या महिलेच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


