ठाणे, प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ठाणे शहरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरासह उपनगरांमध्ये एकूण ६४ मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने मंगळवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीत बदल लागू केले आहेत.
कोर्ट नाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, खोपट, कोपरी आनंदनगर, धामणकर नाका, डोंबिवली पूर्व-पश्चिम, कल्याण फाटा, उल्हासनगर गोल मैदान तसेच सुभाष टेकडी या भागांतून मिरवणुका निघणार असल्याने या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खोपट येथून सकाळी संविधान रॅली काढण्यात येणार असून कोर्ट नाका आणि स्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर स्मारकाजवळ तसेच कोपरी भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळच्या सुमारास मोठ्या मिरवणुकांची गर्दी अपेक्षित असल्याने पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे शहरातील प्रमुख बदल
जीपीओ ते कोर्ट नाका मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना जीपीओ येथे प्रवेश बंद राहील. ही वाहने सेंट्रल मैदान, ठाणे मध्यवर्ती कारागृह, दादोजी कोंडदेव स्टेडियम, अग्निशमन दल मार्गे वळविण्यात येतील. कळवा खाडी पुलाकडून येणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी राहील.
सॅटीस पुलावरून जाणाऱ्या टीएमटी व एसटी बसांना टॉवर नाका व टेंभी नाका मार्गे प्रवेश न देता गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास मार्गे वळविण्यात येणार आहे. टॉवर नाका–टेंभी नाका परिसरातील रिक्षा व चारचाकी वाहनांना मुस चौक येथे प्रवेशबंदी राहील.
कॅडबरी व नौपाड्याकडून डॉ. आंबेडकर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना खोपट येथे अडवून कोलबाड व मिनाताई ठाकरे चौक मार्गे वळवले जाईल. तसेच आंबेडकर रोडवरून खोपटकडे येणाऱ्या वाहनांना उथळसर नाका मार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
डोंबिवलीत १० ठिकाणी बंदी
डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पाटणकर चौक, कोपर ब्रिज, रेतीबंदर चौक, म्हसोबा चौक, ठाकुर्ली टी-पॉइंट आदी दहा ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भिवंडीतील निर्बंध
धामणकर नाका व रांजनोली चौकातून स्व. आनंद दिघे चौक आणि केशरबाग नाका येथे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहील. या वाहनांना वंजारपट्टी मार्गे वळविण्यात येणार आहे.
उल्हासनगरमध्ये पार्किंगलाही मनाई
गोल मैदान, नेहरू चौक, न्यू इरा चौक, शिवाजी चौक ते डॉ. आंबेडकर चौक या मार्गावर वाहन उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सुभाष टेकडी ते लाल चक्की चौक दरम्यान मिरवणूक संपेपर्यंत पूर्णतः प्रवेशबंदी राहील.
कल्याणमध्येही बदल
कल्याण पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र चौक व कल्याण फाटा येथे वाहनांना प्रवेशबंदी राहील. ही वाहने मुंब्रा बाह्यवळण, खारेगाव व मुंबई-नाशिक महामार्गाने वळवली जातील. शहाड जकात नाका मार्गे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रेम ऑटो सर्कल येथे अडविण्यात येईल. तसेच जड-अवजड वाहनांसाठी काही मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. याची वाहन चालकांनी दखल घ्यावी.
दरम्यान, मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी संयम राखून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पर्यायी मार्गांचा अवलंब केल्यास वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


