खेड प्रतिनिधी
ग्रामीण भागात गंभीर गुन्ह्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात सराईत गुन्हेगाराला अखेर खेड पोलिसांनी जेरबंद केले आहे. तब्बल 35 गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेल्या या आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात पोलिसांना यश आले असून या कारवाईत केवळ एका खुनाचा उलगडा न होता तब्बल तीन खुनांच्या मालिकेचा पर्दाफाश झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करत ही मोठी कारवाई यशस्वी केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणाची सुरुवात 18 मार्च 2026 रोजी खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. जैदवाडी परिसरातील एका दुर्गम मोकळ्या जागेत धनंजय मारुती घेवडे (वय 33) यांचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लोखंडी हत्याराने केलेल्या मारहाणीचे गंभीर घाव होते. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटनास्थळ अत्यंत दुर्गम असल्याने थेट पुरावे मिळणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते.
तपास अडचणीत असतानाही पोलिसांनी हार न मानता तांत्रिक तपासाची दिशा स्वीकारली. घटनास्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंतच्या परिसरातील तब्बल 110 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले. सलग सहा दिवस तपास करत पोलिसांनी 145 किलोमीटरपर्यंतचा प्रवास ट्रॅक केला. या तपासातून ललित दिपक खोल्लम (रा. शिरोली, ता. खेड) आणि त्याचा साथीदार नंदलाल दिलीप होले (रा. कारेगाव, ता. आंबेगाव) हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले.
यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वडगाव निंबाळकर परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी उसाच्या शेतातून पळ काढत नदीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करत दोघांनाही नदीत उडी मारण्यापूर्वीच ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. धनंजय घेवडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून ललित खोल्लम आणि नंदलाल होले यांनी संगनमताने लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण करून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा चौकशीत झाला.
या खुनाच्या कटात निलेश कैलास सणस याने आर्थिक मदत केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी खूनासाठी वापरलेले लोखंडी रॉड, दगड, आरोपींनी जाळून टाकलेल्या कपड्यांचे अवशेष तसेच मयताचा मोबाईल फोन जप्त केला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मोबाईल फोन विहिरीत फेकून दिला होता.
दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. मुख्य आरोपी ललित खोल्लम याने यापूर्वीही दोन खून केल्याची कबुली दिली. तपासात उघड झाले की ठाणे येथे एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर त्या तरुणाच्या आईला शिरोली येथे बोलावून तिलाही निर्दयीपणे ठार मारण्यात आले. या खुलाशामुळे पुणे ग्रामीण हद्दीतील दोन आणि ठाणे शहरातील एक असे एकूण तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुख्य आरोपी ललित खोल्लम हा अत्यंत कुख्यात सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी असे तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. आरोपी फरार असताना मध्यप्रदेशातून गावठी पिस्तुले आणून त्यांची विक्री करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन गावठी पिस्तुले आणि काडतुसे जप्त केली आहेत.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी दाखवलेली चिकाटी, संयम आणि तांत्रिक तपास विशेष ठरला. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सध्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


