अमरावती प्रतिनिधी
अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सराफा व्यावसायिकावरच्या धाडसी दरोड्याचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने व रोकड पोलिस आयुक्तांच्या हस्ते फिर्यादीला परत देण्यात आल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
१३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. बालाजी नगर परिसरातील सराफा व्यावसायिक सुशांत शेरेकर हे आपले ‘सुमित्रा ज्वेलर्स’ हे दुकान बंद करून घरी निघाले होते. दुकानातील सोने आणि रोकड असलेली पिशवी त्यांनी आपल्या मोपेडच्या डिक्कीत ठेवली होती. ते घरी जात असताना अचानक काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तिघांनी त्यांची गाडी अडवली.
आरोपींनी चाकूचा धाक दाखवत शेरेकर यांना खाली पाडले आणि मोपेडच्या डिक्कीत ठेवलेली सोन्याची पिशवी व रोकड हिसकावून घेतली. काही क्षणांतच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. शेरेकर यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या दरोड्याचा उलगडा केला. या कारवाईत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच आरोपी दरोडा टाकणाऱ्या चारचाकीत होते, तर दोन आरोपींनी रेकी केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ६६१.०३० ग्रॅम सोन्याचे दागिने (सुमारे ९९.१५ लाख रुपये) आणि १ लाख १९ हजारांची रोकड असा एकूण १,००,३४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार, मोबाईल फोन तसेच शस्त्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
या प्रकरणातील जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने व रोकड न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (दि. ७ एप्रिल २०२६) पोलिस आयुक्तांच्या हस्ते फिर्यादी सुशांत शेरेकर यांना सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे (परिमंडळ २), पोलीस उपायुक्त गणेश शिंदे (परिमंडळ १), पोलीस उपायुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजया पंधरे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार मानकर, मनीष वाकोडे, महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने तसेच गुन्हे शाखा पथक आणि गाडगेनगर डीबी पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई पार पाडली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार मानकर यांनी पूर्ण करून आरोपींविरुद्ध सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.


