सातारा प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात बावधन गटातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देत महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढत तीव्र निषेध नोंदवला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे दहन करून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आणि जिल्हा परिषद सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.
बावधन गटातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील गणपती घाट येथून मोर्चाला सुरुवात केली. किसन वीर चौक, विष्णू मंदिर मार्गे हा मोर्चा शिंदे यांच्या घराच्या दिशेने निघाला. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी किसन वीर चौकात मोठ्या संख्येने जमून ऋतुजा शिंदे यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी “राजीनामा द्या, राजीनामा द्या, ऋतुजा शिंदे राजीनामा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार, तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा जगताप, दिलीप पिसाळ, प्रा. डॉ. नितीन कदम, जिल्हा परिषद सदस्य वृषाली चव्हाण, पंचायत समिती सदस्य राणी पवार, प्रा. रूपाली कदम, अरुणा पवार, निशा डाळवाले, लक्ष्मी कळंबे, अर्चना पवार यांच्यासह बावधन गट आणि शेंदूरजणे गणातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना प्रतापराव पवार म्हणाले की, “ज्यांच्या जिवावर निवडून आले त्या मकरंद पाटील यांच्याशी हे पतिपत्नी धादांत खोटे बोलत आहेत. पक्षाशी विश्वासघात करणाऱ्या ऋतुजा शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावाच.”
तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले, “ऋतुजा शिंदे यांच्या कृतीमुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. पक्षनिष्ठा पायदळी तुडवत त्यांनी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांना मान्य नाही.”
बाजार समितीचे सभापती मोहन जाधव यांनीही शिंदे कुटुंबावर टीका करत, “काँग्रेस, शिवसेना अशा कोणत्याच पक्षात निष्ठेने न राहिलेल्या विराज शिंदे यांनी मतदानाची शाई वाळण्यापूर्वीच पक्षांतर करून विश्वासार्हता गमावली आहे,” असे सांगितले.
दिलीप पिसाळ यांनीही संताप व्यक्त करत, “सक्षम उमेदवार असतानाही आम्ही ऋतुजा शिंदे यांना उमेदवारी देण्यात चूक केली. अनेक मंत्र्यांची सुपारी घेणाऱ्या विराज शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भूमिकेमुळेच जिल्हा परिषद सत्तेचे गणित बिघडले,” असा आरोप केला.
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन शिंदे यांच्या घराजवळ मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी, दिलीप पवार, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, अमित सुर्वे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
भाजपकडून शिंदे यांना पाठिंबा
राष्ट्रवादीच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिंदे यांच्या समर्थनार्थ उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, पंचायत समिती सदस्य डॉ. सुरभी भोसले, सचिन भोसले, नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक-नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘विराजला घरातून हाकलले’ – रतनसिंह शिंदे
दरम्यान, राष्ट्रवादीचा मोर्चा शिंदे यांच्या घराकडे येत असताना ऋतुजा शिंदे यांचे वडील रतनसिंह शिंदे आणि दीर गजेंद्र शिंदे यांनी मोर्चाला सामोरे जात आपली भूमिका स्पष्ट केली. रतनसिंह शिंदे म्हणाले, “विराज आणि त्याच्या पत्नीला आम्ही घरातून हाकलून दिले आहे. आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.” या वक्तव्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला; मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील या राजकीय घडामोडींमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या वादळाची चिन्हे दिसू लागली असून पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


