सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील गुणी विद्यार्थिनी निलम शिंदे (वय ३५) हिचा अमेरिकेत झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १४ महिने मृत्यूशी झुंज देत अखेर दुर्दैवी अंत झाला. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या निलमचा हा दु:खद शेवट शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला आहे.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने निलमला जोरदार धडक दिली होती. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच हात, पाय आणि छातीवरही गंभीर जखमा झाल्या. अपघातानंतर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र तिची प्रकृती सुधारली नाही आणि ती कोमातच राहिली.
१४ महिन्यांची जीवघेणी झुंज अखेर हरली
अपघातानंतर निलमवर अतिदक्षता विभागात दीर्घकाळ उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिच्या मज्जासंस्थेमध्ये कोणतीही लक्षणीय सुधारणा दिसून आली नाही. उपचारांमधील गुंतागुंत वाढत गेल्याने अखेर २८ मार्च रोजी डॉक्टरांनी जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावली आणि निलमने प्राण सोडले.
अवयवदानातून दिला जीवनाचा संदेश
मृत्यूच्या दारात असतानाही निलमने समाजासाठी मोठा आदर्श ठेवला आहे. तिच्या अखेरच्या इच्छेनुसार तिचे अवयव दान करण्यात येणार असून, यामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे. दु:खाच्या काळातही मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवणारा हा निर्णय कौतुकास्पद मानला जात आहे.
कुटुंबाचा व्हिसासाठी संघर्ष
अपघातानंतर निलमला भेटण्यासाठी तिच्या कुटुंबाला अमेरिकेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वडील तानाजी शिंदे आणि भावाला आपत्कालीन व्हिसा मिळवण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न करावे लागले. या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी हस्तक्षेप करत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणांकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे कुटुंबीयांना व्हिसा मंजूर झाला.
आधी पत्नी, आता मुलगी… वडिलांवर दु:खाचा डोंगर
निलमच्या अपघातापूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे वडील तानाजी शिंदे यांच्यावर आधी पत्नी आणि आता मुलगी गमावण्याचे दुहेरी दुःख कोसळले आहे. मागील १४ महिन्यांपासून आशा-निराशेच्या संघर्षात असलेल्या कुटुंबासाठी हा काळ अत्यंत वेदनादायी ठरला.
साताऱ्याहून अमेरिकेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
निलम शिंदे गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत संगणकशास्त्राचे शिक्षण घेत होती. साताऱ्यासारख्या ग्रामीण भागातून परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हा तिचा मोठा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास होता. कुटुंबाचे व समाजाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती मेहनत घेत होती. मात्र एका निष्काळजी चालकाच्या बेफिकीरपणामुळे तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
आज अंत्यसंस्कार
निलम शिंदे यांच्यावर ८ एप्रिल रोजी (भारतीय वेळेनुसार पहाटे १ वाजता) अमेरिकेत हिंदू धर्माच्या चालीरीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


