प्रतिनिधी | स्वप्नील गाडे
मुंबई : भोईवाडा परिसरात ज्येष्ठ नागरिकाला ओळखीचा बनाव करून बोलण्यात गुंतवून सोन्याची चैन लंपास करणाऱ्या टोळीतील सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
३० मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजता जॉसेफ सी. ए. फर्नांडीस (७१) हे गौरीशंकर मिठाई दुकानासमोरून पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. ‘तू राजूचा भाऊ आहेस ना?’ असे म्हणत ओळखीचा बहाणा करत त्यांनी फर्नांडीस यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘तू मला ओळखत नाहीस का? चला चहा घेऊ’ असा आग्रह धरण्यात आला. दुसऱ्या साथीदारानेही संभाषणात सहभागी होत ‘हा मोठा माणूस आहे, दुकानही याचेच आहे’ असे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
या बनावट ओळखीच्या आडून आरोपींनी फर्नांडीस यांना पूर्णपणे गाफील केले. त्यानंतर त्यांच्या हातातील पिशवीतील वस्तू तपासण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोन्याची चैन काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. मात्र चैन सुरक्षित ठेवली असल्याचा आभास निर्माण करून आरोपींनी ती चलाखीने लंपास केली.
दरम्यान, फर्नांडीस यांना संशय आल्याने त्यांनी पिशवी तपासली असता चैन गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि एका आरोपीला पकडण्यात यश आले. मात्र दुसरा आरोपी १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पेंडलसह घेऊन पसार झाला.
या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान फरार आरोपीचे नाव नरेश उर्फ नऱ्या विजयकुमार जयस्वाल (४०) असे असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेत कल्याण परिसरात सापळा रचला आणि त्याला अटक केली.
पोलिस तपासात जयस्वाल हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत एकूण ५९ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांकडून त्यासाठी पथके कार्यरत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त घनश्याम पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक महाडीक, पोउनि सचिन बोरसे, पो. ह. नितीन धंगेकर, पो. ह. महादेव माळी, पो.शि. हेमंत सुळे, पो.शि. संदीप भरसट यांनी केली.


