प्रतिनिधी|रणजित मस्के
जे. जे. मार्ग पोलीस ठाणे पथकाने पार्क केलेल्या कारची काच फोडून तसेच बनावट चावीने दरवाजे उघडून लॅपटॉप, सोने व इतर किमती वस्तू चोरी करणाऱ्या आंतरराज्य सराईत आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण सात गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.
२२ मार्च २०२६ रोजी सैफी दर्गा परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. फातेमा तीनवला यांच्या कारमधून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व ३७ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी सलग पाच दिवस ८० ते ९० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. पायधूनी, नागपाडा, अग्रीपाडा, कामाठीपुरा, व्ही. पी. रोड, गावदेवी आदी परिसरात आरोपी फिरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून सीएसटी येथील मनीष मार्केट परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली.
अटक आरोपीचे नाव ईसरार जलाल अहमद शेख (वय ४६) असे असून तो नागपाडा परिसरातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा मुक असल्याचे नाटक करून चोरी करत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. मागील दोन महिन्यांपासून त्याने मुंबईत अनेक ठिकाणी अशाच प्रकारे कार फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल व इतर महागड्या वस्तूंचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तडवी, घाडगे तसेच पोलीस शिपाई शेवरे, दळवी, डावरे व चौधरी यांनी केला.


