रंजीत मस्के | प्रतिनिधी
वाई : तालुक्यातील आसरे परिसरात केबल चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे अखेर अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२८ मार्च २०२६ रोजी आसरे गावातील शेतकऱ्यांनी केबल चोरी करताना एका संशयित इसमाला पकडून ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी अक्षय विलास गायकवाड (रा. वणें अंगापूर, ता. सातारा) याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने आसरे, आकोशी आणि कोंढवली परिसरात चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून एमएच ११ डीके ३५९७ क्रमांकाचे वाहन जप्त केले. पुढील चौकशीत आरोपीकडून ७६० मीटर केबल व ४३ किलो तांब्याची तार असा एकूण २,९६,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात वाई पोलीस ठाण्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले असून भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपास पथक प्रमुख सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार इथापे, तसेच पोलीस कर्मचारी नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, श्रवण राठोड, पोलीस पाटील संदेश वैराट, गणेश जरंडे व सचिन सणस यांनी सहभाग घेतला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले असून पुढील तपास पोलीस हवालदार इथापे करीत आहेत.


