मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र वादंग निर्माण झाला आहे. महापौर दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांना बोलावून त्यांचा अपमान केल्याचा आरोप माजी महापौर व शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. या घटनेनंतर पालिकेच्या सभागृहात जोरदार खडाजंगी झाली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
महापौर दालनातील घटनेने राजकारण तापले
मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांनी कोणतीही पूर्वकल्पना किंवा ठोस अजेंडा न देता सर्वपक्षीय गटनेत्यांना तातडीच्या बैठकीसाठी दालनात बोलावले होते. त्यानुसार ठाकरे गटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर, मनसेचे यशवंत किल्लेदार, एमआयएमचे विजय उबाळे तसेच समाजवादी पक्षाचे गटनेते दालनात उपस्थित झाले.
याचवेळी उपमहापौर संजय घाडी आणि सत्ताधारी गटाचे नेते अमेय घोले यांच्यासह काही नगरसेवक दालनात दाखल झाले. त्यानंतर अमेय घोले यांनी महापौरांना “आम्हाला काही महत्त्वाचे बोलायचे आहे” असे सांगत इतर गटनेत्यांना काही वेळ दालनाबाहेर थांबण्यास सांगितल्याचे सांगितले जाते.
विरोधकांच्या मते, महापौरांनीही सत्ताधारी नगरसेवकांशी चर्चा करण्यासाठी इतर गटनेत्यांना बाहेर थांबवले. त्यामुळे विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली.
‘आमचा अपमान खपवून घेणार नाही’
या प्रकारानंतर संतप्त झालेल्या किशोरी पेडणेकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
“महापौरांच्या बोलावण्यावरून आम्ही बैठकीला गेलो होतो. मात्र तिथे आम्हाला बाहेर थांबवून आमचा अपमान करण्यात आला. विरोधकांचा असा अवमान आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनीही पेडणेकरांच्या भूमिकेला पाठिंबा देत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. विरोधकांचा अपमान करणे ही पालिकेत नवी परंपरा सुरू होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
पालिकेत ‘मानापमान’ नाट्य
दरम्यान, मुंबई महापालिकेत सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत वाद आणि मानापमानाचे राजकारण सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासकीय कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांना दुय्यम स्थान दिल्याच्या मुद्द्यावरून आधीच नाराजी व्यक्त होत असताना आणखी एका कार्यक्रमावरून वाद उफाळून आला.
सायन रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमातही वाद निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमात महापौर वगळता पालिकेतील इतर समिती अध्यक्ष आणि अनेक नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
विशेष म्हणजे, महापालिकेच्या रुग्णालयाशी संबंधित कार्यक्रम असतानाही पालिकेतीलच काही लोकप्रतिनिधींना सुरक्षारक्षकांकडून प्रवेश नाकारल्याची घटना घडल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
राजकीय वातावरण ढवळून निघाले
महापौर दालनातील घटनेनंतर पालिकेच्या सभागृहात वातावरण चांगलेच तापले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत हा लोकशाही प्रक्रियेचा अवमान असल्याचा आरोप केला.
या वादामुळे मुंबई महापालिकेतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


