मुंबई प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई महापालिका) आयुक्तपदी अखेर वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी मंगळवारी (31 मार्च) सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या उत्तराधिकारीबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्तपदावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चुरस रंगली होती. मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या अश्विनी भिडे यांच्यासह नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र अखेरीस भिडे यांनी बाजी मारत महापालिकेच्या सर्वोच्च प्रशासकीय पदाची धुरा आपल्या हाती घेतली.
वर्षा बंगल्यावर चर्चा; निर्णयाला शिक्कामोर्तब
आयुक्तपदाबाबत अंतिम निर्णय होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत अश्विनी भिडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. निर्णयानंतर भिडे यांनी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी (31 मार्च) त्या विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
महापालिकेत ‘महिला नेतृत्व’
मुंबई महापालिकेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी निवड झाली आहे. आता आयुक्तपदीही महिला अधिकारी नियुक्त झाल्याने महापालिकेत प्रशासन आणि राजकीय नेतृत्व या दोन्ही पातळ्यांवर महिला नेतृत्व दिसून येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोण आहेत अश्विनी भिडे?
1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणूनही ओळख मिळाली आहे. विविध पायाभूत प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासनात त्यांची ओळख कडक आणि परिणामकारक अधिकारी अशी आहे.
गगराणी मुदतवाढीसाठी प्रयत्नशील?
दरम्यान, सेवानिवृत्त होणारे भूषण गगराणी हे मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. मात्र सेवा नियमांनुसार मुख्य सचिव पदाव्यतिरिक्त इतर पदांवर सहसा मुदतवाढ दिली जात नाही. यापूर्वी 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळवून दिली होती. त्याच धर्तीवर गगराणी यांनाही मुदतवाढ मिळेल का, याबाबत काही दिवस चर्चा रंगली होती. मात्र अखेरीस नव्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुंबईसारख्या महानगराच्या प्रशासनाची धुरा आता अश्विनी भिडे यांच्या हातात येत असल्याने पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शहरी विकास आणि महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनात कोणते नवे निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


