भंडारा प्रतिनिधी
भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या आलिशान टोयोटा फाच्युनर कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार पडोळे हे पहाटे भंडाऱ्यावरून नागपूरकडे निघाले होते. सध्या दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने नागपूर विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी ते प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या गाडीत काही सहकारीही उपस्थित होते.
दरम्यान, मार्गावर अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिकही घाबरले. अपघातानंतर कारचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.
अपघातात खासदार पडोळे यांना किरकोळ दुखापत झाली असून इतर सहकारी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या अपघातामुळे काही काळ त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे याच मार्गावर यापूर्वीही दोन वेळा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


