अकोला प्रतिनिधी
आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याची चर्चा सुरू असताना अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरच्या टंचाईची समस्या निर्माण होत आहे. मात्र अकोला शहरातील एका शाळेने दशकभरापूर्वीच या समस्येवर दूरदृष्टीने उपाय शोधला असून गॅस सिलिंडरचा वापर न करता दररोज तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांचे जेवण तयार केले जात आहे. या अभिनव प्रयोगामुळे इंधनाची मोठी बचत होत असून स्वयंपाकही अधिक सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने केला जात आहे.
अकोल्यातील प्रभात किड्स स्कूल ही पश्चिम विदर्भातील पहिली डे-बोर्डिंग शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना रोज नाश्ता आणि दुपारचे जेवण दिले जाते. सुमारे दीड हजार विद्यार्थी आणि शाळेचा कर्मचारीवर्ग दररोज शाळेतच भोजन घेतो. एवढ्या मोठ्या संख्येचा स्वयंपाक करण्यासाठी येथे अत्याधुनिक ‘फ्लेमलेस किचन’ उभारण्यात आले असून गेल्या दहा वर्षांपासून ही यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत आहे.
‘थर्मिक फ्लुईड हिटर’वर आधारित यंत्रणा
या किचनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे पारंपरिक गॅस किंवा उघड्या ज्वालेचा वापर केला जात नाही. शाळेच्या स्वयंपाकगृहात ‘थर्मिक फ्लुईड हिटर’ ही विशेष यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेत कुटार, कडबा यांसारख्या शेतीतील अवशेषांपासून तयार केलेल्या गट्टूंचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. या माध्यमातून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा उपयोग मोठ्या भांड्यांमधील अन्न शिजवण्यासाठी केला जातो.
ही यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च आला होता. मात्र दीर्घकालीन दृष्टीने ती अत्यंत किफायतशीर ठरली आहे. दीड हजार जणांसाठी गॅसवर स्वयंपाक करायचा झाल्यास दररोज सुमारे सहा हजार रुपयांचा खर्च झाला असता. या फ्लेमलेस किचनमुळे तो खर्च सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत मर्यादित राहतो. त्यामुळे शाळेला दररोज मोठी आर्थिक बचत होते.
स्वयंपाकगृहात नाही आग, नाही गॅस
या आधुनिक किचनमध्ये कुठेही उघडी आग किंवा गॅस सिलिंडर दिसत नाही. त्यामुळे स्वयंपाकगृहातील तापमानही तुलनेने कमी राहते आणि कर्मचाऱ्यांसाठी काम करणे अधिक सुरक्षित ठरते. यंत्रणेच्या साहाय्याने एकावेळी शंभर ते दीडशे किलोपर्यंत भाजी सहज शिजवता येते. तसेच कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करणे शक्य होते.
पोळ्या, पापडही फ्लेमलेस पद्धतीने
या किचनमध्ये केवळ भाजी किंवा भातच नव्हे तर पोळ्या आणि पापड देखील तयार केले जातात. अन्न शिजवताना स्वच्छता, पौष्टिकता आणि सुरक्षितता यांना विशेष प्राधान्य दिले जाते. मोठ्या प्रमाणात अन्न शिजवतानाही त्याची गुणवत्ता टिकून राहते, असा अनुभव शाळेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे म्हणाले, “या यंत्रणेच्या वापरामुळे इंधनाची बचत तर होतेच, शिवाय स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे किचन अत्यंत सुरक्षित आहे. कमी वेळेत मोठ्या संख्येच्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक अन्न तयार करता येते.”
संस्थेचे सचिव नीरज आवंडेकर यांनी सांगितले की, “सुमारे दहा वर्षांपूर्वी हा प्रयोग पाहिल्यानंतर आम्ही शाळेत ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. गॅस सिलिंडरची गरज नाही, इंधन व वेळेची बचत होते आणि स्वयंपाकघरातील सुरक्षितताही वाढते. या सर्व गोष्टी एकाच वेळी साध्य झाल्या आहेत.”
इंधन बचतीचा आदर्श प्रयोग
गॅस टंचाई आणि वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील या शाळेचा ‘फ्लेमलेस किचन’ प्रयोग अनेक शैक्षणिक संस्था आणि मोठ्या स्वयंपाकगृहांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि सुरक्षित अशी ही यंत्रणा भविष्यात इंधन बचतीचा प्रभावी पर्याय ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.


