मुंबई प्रतिनिधी
राज्यात राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), बृहन्मुंबईला राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि त्यांच्या चमूचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. कल्याणकर यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाने शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविला होता. या मोहिमेअंतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील विविध शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला.
या उपक्रमात राज्यातील एकूण १९७ महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, शासकीय व निमशासकीय संस्था, मंडळे आणि कंपन्यांचे दोन टप्प्यांत मूल्यमापन करण्यात आले. कठोर निकषांवर आधारित या मूल्यमापन प्रक्रियेनंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांची राज्यात द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली.
या मूल्यमापनात सहभागी कार्यालयांचे कामकाज सात प्रमुख डिजिटल घटकांवर तपासण्यात आले. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेनचा वापर, तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या तंत्रज्ञानांचा वापर यांचा समावेश होता.
या सर्व प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या सन्मानामुळे प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, भविष्यात नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्यासाठी प्रयत्न अधिक वेगाने सुरू राहतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.


