मुंबई प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय वर्तुळातील धागेदोरे समोर येऊ लागल्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणात माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांना विशेष तपास पथकाकडून (SIT) समन्स बजावण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदाच एखाद्या राजकीय व्यक्तीची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढू लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही त्यांनी राजीनामा दिला. या दोन राजीनाम्यांनंतर आता SIT कडून आलेल्या समन्समुळे चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या प्रकरणात चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी सुषमा अंधारे तसेच रूपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. या मागण्यांमुळे राज्य सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केल्याचे मानले जात आहे.
शिवानिका संस्थेच्या सदस्यांचीही चौकशी
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ‘शिवानिका’ संस्थेचे सर्व आजी-माजी सदस्यही SIT च्या रडारवर आले आहेत. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांपासून विविध उपक्रमांपर्यंतच्या सर्व बाबींची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच या संस्थेच्या सर्व सदस्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे समजते.
तथापि समन्स पाठवणे ही तपास प्रक्रियेतील एक नियमित बाब असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. “समन्स म्हणजे कोणावर आरोप सिद्ध झाले असा अर्थ होत नाही. तपासासाठी संबंधित व्यक्तींना माहिती घेण्यासाठी बोलावले जाते,” असे त्यांनी सांगितले.
भोंदू खरातला कोर्टात हजर
दरम्यान आरोपी अशोक खरात याला विशेष न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलीस उपायुक्त कार्यालयात नेण्यात आले. उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या कार्यालयात त्याला काही वेळ ठेवण्यात आले होते. या ठिकाणी तपासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यानंतर खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या त्याच्या मोबाईलचा फॉरेन्सिक अहवाल SIT कडे प्राप्त झाला असून त्यातून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
न्यायालयात जोरदार युक्तिवाद
न्यायालयात सुनावणीदरम्यान पीडितांच्या वकिलांनी आरोपी अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. “आरोपी सत्य सांगत नाही. या प्रकरणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,” असे म्हणत त्याच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी मात्र खरातला आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयात सांगितले. सध्या अशोक खरातविरुद्ध एकूण ११ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ९ गुन्हे लैंगिक शोषणाचे तर २ गुन्हे फसवणुकीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात SIT चा तपास पुढे सरकत असताना आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राजकीय आणि सामाजिक स्तरावर या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.


