मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासावर रविवारी पुन्हा एकदा मेगाब्लॉकचे सावट असणार आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांवर विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी रविवारी (२९ मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे अनेक उपनगरीय गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून काही गाड्या रद्दही राहणार आहेत. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पश्चिम रेल्वेवर पूल क्रमांक ६१ च्या पुनर्बांधणीच्या कामासाठी २८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजल्यापासून २९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत कांदिवली आणि बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच २९ मार्च रोजी पहाटे १.०० ते ४.३० या वेळेत डाऊन फास्ट मार्गावरही ब्लॉक ठेवण्यात येणार आहे.
ब्लॉकच्या काळात गोरेगाव ते बोरीवली दरम्यान धावणाऱ्या सर्व धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. डाऊन फास्ट मार्गावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे काही गाड्या पाचव्या मार्गावरून धावतील आणि त्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर थांबणार नाहीत. याशिवाय ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकावरील फलाट क्रमांक १ आणि २ वरून गाड्यांची ये-जा होणार नाही.
काही उपनगरीय गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार असून काही सेवा अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय अंधेरी ते बोरीवली दरम्यान धावणाऱ्या सर्व १५ डब्यांच्या धीम्या गाड्या या कालावधीत जलद गाड्यांप्रमाणे धावतील.
दरम्यान, विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेवरही रविवारी उपनगरीय विभागात मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक राहणार आहे.
या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे त्या पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर आणण्यात येतील. परिणामी या गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड ते माटुंगा दरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. माटुंगा येथे त्या पुन्हा अप धीम्या मार्गावर आणण्यात येतील. त्यामुळे या गाड्यांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होणार आहे.
दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार असून ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत अप आणि डाऊन मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. या कालावधीत वाशी, नेरुळ आणि ठाणे दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील.
तसेच ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ दरम्यान वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन सेवा रद्द राहतील. तर पनवेल, नेरुळ आणि वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ दरम्यान ठाण्याच्या दिशेने धावणाऱ्या अप गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता असून पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे. तसेच प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवूनच प्रवासाचे नियोजन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


