अमरावती, प्रतिनिधी
अमरावती : शासकीय कामे पूर्ण करूनही त्यांची कोट्यवधी रुपयांची देयके वेळेवर मिळाली नाहीत, तर त्याचा आर्थिक फटका संबंधित कंत्राटदाराला किती गंभीरपणे बसू शकतो, याची जाणीव करून देणारी धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरूड येथे घडली आहे. शासकीय कामांचे जवळपास अडीच कोटी रुपये थकीत असल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सुनील वागद्रे या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या कथित सुसाईड नोटमधील मजकुरामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शासकीय देयकांच्या विलंबाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत कुटुंबाची काळजी
सुनील वागद्रे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या मोठ्या पुतण्याला, घनश्यामला उद्देशून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचे आवाहन केल्याचे समोर आले आहे. लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करणे, काकूची देखभाल करणे आणि कुटुंबाला आधार देणे, अशा जबाबदाऱ्या त्यांनी पुतण्यावर सोपवल्याचे चिठ्ठीतील मजकुरावरून दिसते.
‘घनश्याम, मला माफ कर. तुला पुढे सगळे सांभाळायचे आहे. तुझ्या लहान भाऊ-बहिणींचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. तू त्यांचा मोठा भाऊ आहेस. तूच आता त्यांच्याकडे आणि काकूच्या देखभालीकडे लक्ष दे,’ अशा आशयाचे भावनिक शब्द त्यांनी लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. या मजकुरामुळे वागद्रे यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची तीव्रता अधोरेखित होत आहे.
थकीत बिले, बँकांचे कर्ज अन् आर्थिक विवंचना
वागद्रे यांनी केलेल्या शासकीय कामांची जवळपास अडीच कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही रक्कम न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला होता. दुसरीकडे, बँकांकडून घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्याचेही आव्हान त्यांच्यासमोर होते. या आर्थिक अडचणींचा उल्लेख कथित सुसाईड नोटमध्ये करण्यात आल्याचे समोर आले आहे.
चिठ्ठीत काही व्यक्तींच्या नावावर असलेल्या दोन बिलांचा उल्लेख करून ती देयके मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना पुतण्याला करण्यात आली आहे. संबंधितांकडून पैसे वसूल करून देणी चुकती करावीत, असेही त्यात नमूद असल्याचे सांगण्यात येते. तसेच बगीच्याची देखभाल करावी आणि तो विकून उत्क्रांती बँकेचे कर्ज फेडावे, अशी सूचनाही त्यांनी केल्याचे वृत्त आहे. खामगाव बँकेतील सोन्याच्या कर्जाचाही उल्लेख चिठ्ठीत असल्याचे समोर आले आहे.
‘माझ्या निर्णयामागे कोणीही जबाबदार नाही’
आपल्या मृत्यूच्या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे वागद्रे यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे सांगण्यात येते. मात्र, शासकीय देयके रखडल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडल्याचा मुद्दा या घटनेनंतर चर्चेत आला आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी आणि तपासातूनच परिस्थितीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
गावात संताप; शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर जरूड परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. शासकीय कामे करूनही देयके मिळविण्यासाठी कंत्राटदारांना प्रतीक्षा करावी लागत असेल, तर त्याचा त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि कुटुंबावर काय परिणाम होतो, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात ‘ही आत्महत्या नसून शासनाने घेतलेला बळी आहे,’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याचेही सांगण्यात येते.
दरम्यान, सुनील वागद्रे यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, थकीत देयकांचे स्वरूप, संबंधित विभागांची भूमिका आणि कर्जाचा तपशील यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. शासकीय कामांची बिले वेळेत मंजूर होतात का, देयके प्रलंबित राहण्यामागील कारणे कोणती आणि अशा परिस्थितीत कंत्राटदारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कोणती व्यवस्था आहे, या प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.


