अमरावती, प्रतिनिधी
अमरावती : वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नुकताच बी.ए.एम.एस. पदवीधर झालेल्या २२ वर्षीय तरुण डॉक्टरचा झोपेत संशयास्पद मृत्यू झाल्याने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आदित्य रावटे असे मृत डॉक्टरचे नाव असून, वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आला, त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.
आदित्य हा नाशिक येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. बी.ए.एम.एस.ची पदवी मिळवल्यानंतर तो आपल्या गावी आला होता. घटनेच्या वेळी तो खोलीत झोपला होता. काही वेळाने तो प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी पाहणी केली असता तो खोलीत उलट्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याचेही निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक पाहणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत श्वासावरोध आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
दरम्यान, आदित्यला बालपणापासून अपस्माराचा त्रास असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. तसेच त्वचेचा रंग गोरा करण्यासाठी तो काही औषधांचा स्वतःवर प्रयोग करत असल्याचेही कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या औषधांचे अतिसेवन किंवा त्याचा अपस्माराचा आजार यापैकी कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
मृत्यूचे अचूक कारण समोर आणण्यासाठी व्हिसेरा तपासणी तसेच सविस्तर शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या अहवालानंतरच औषधांच्या सेवनाचा मृत्यूशी संबंध होता की अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

