स्वप्नील गाडे | प्रतिनिधी
मुंबई : जुहू परिसरातील एका सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
१ फेब्रुवारी २०२६ रोजी जुहू परिसरात सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर गोळीबाराची घटना घडली होती. घटनेनंतर जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करत या प्रकरणातील एकूण १३ आरोपींना यापूर्वी अटक केली होती. गुन्ह्याचे स्वरूप संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यात आला.
दरम्यान, तपासादरम्यान मुख्य सूत्रधार प्रदीप राधामोहन शर्मा उर्फ गोलू पंडित (वय २०) हा उत्तर प्रदेशातील आग्रा येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने आग्रा येथे सापळा रचून २१ मार्च रोजी त्याला ताब्यात घेतले. तपासात आरोपीने गोळीबार करणाऱ्या इतर आरोपींना चिथावणी देत आर्थिक तसेच इतर स्वरूपाची मदत केल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला २२ मार्च रोजी विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.


