छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारेगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटची पाळेमुळे मराठवाडाभर पसरलेली असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी पिसादेवी परिसरात सापळा रचून आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींपैकी एकाने केवळ युट्यूबच्या माध्यमातून गर्भलिंगनिदान करण्याचे प्रशिक्षण घेतल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात वॉर्डबॉय राहुल माणिकराव झोंड आणि सोमनाथ परसराम बारसे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याला डमी रुग्ण बनवून सापळा रचण्यात आला. लिंगनिदानासाठी १४ हजार रुपयांचा सौदा ठरवण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे आरोपी पिसादेवी परिसरात कारमधून आले असता पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. आरोपींकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी प्रोब आणि टॅब जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे आणि संबंधित महिलेचा पती सपकाळ हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
७ मार्च रोजी मराठवाड्यात गर्भपाताचे मोठे रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात नारेगाव परिसरात एका विवाहितेचे घरातच गर्भलिंगनिदान करून गर्भपात करण्यात आल्याचे उघड झाले. विवाहितेच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी डमी पती-पत्नी पाठवून कारवाई करत हे रॅकेट उघडकीस आणले.


