कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असतानाच दुसरीकडे अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच सीमावर्ती भागांमध्ये मंगळवारी जोरदार पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने काही ठिकाणी रस्त्यांवर अक्षरशः बर्फाची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अनोख्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असले, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्राच्या सीमेजवळील कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यातील पाच्छापूर गावात मंगळवारी दुपारी प्रचंड गारपीट झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गारा पडल्या की गावात हिमवर्षाव झाल्यासारखे दृश्य निर्माण झाले. गावातील वयोवृद्ध नागरिकांनी अशा प्रकारचा बर्फवृष्टीसदृश्य गारांचा पाऊस प्रथमच पाहिल्याचे सांगितले. गारांनी रस्ते, मोकळी मैदाने आणि घरांचे अंगण पांढरेफटक झाले होते. या अनोख्या गारपिटीबाबत सध्या गावकरी आश्चर्य व्यक्त करत चर्चा करताना दिसत आहेत.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेलगत मंगळवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही मिनिटांतच गारपीट सुरू झाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. गारांचा मारा इतका तीव्र होता की रस्त्यांवर आणि महामार्गांवर गारांचा खच पडला. अनेक ठिकाणी रस्ते पांढऱ्या गारांनी झाकले गेले आणि वातावरण शिमला किंवा काश्मीरप्रमाणे दिसू लागले.
बेळगाव परिसरातही मुसळधार पावसाने थैमान घातले. गारपीट इतक्या वेगाने झाली की काही वेळासाठी वाहनचालकांनाही वाहतूक करणे कठीण झाले. अनेक ठिकाणी गारांचा सडा पडल्याने परिसरात काश्मीरसारखे वातावरण निर्माण झाले होते. या गारपिटीमुळे काही भागांत शेतीचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातही अवकाळी पावसासह गारपीट झाली. अक्कलकोट शहरासह तालुक्यातील सांगवी बु., घोळसगाव, बोरगाव या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. गारपिटीमुळे गहू, ज्वारी आणि द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
सांगली शहरालाही वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने झोडपून काढले. सुमारे ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. ऐन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारांच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. जवळपास पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आणि जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातही अवकाळी पावसासह गारपिटीने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या ‘यलो अलर्ट’नुसार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लातूर शहरासह निलंगा तालुक्यातील सरवडी, मुदगड, एकोजी, हाडोळी तसेच अहमदपूर आणि औसा तालुक्यात गारांचा वर्षाव झाला. गारपिटीमुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून आंबा बागांनाही फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने बागायतदारांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील अनेक भागांत एकीकडे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


