सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेत सत्तेसाठी झालेल्या चुरशीच्या राजकीय लढतीत अखेर भाजपने बाजी मारत इतिहास रचला आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही कौशल्यपूर्ण राजकीय डावपेच रचत भाजपने केवळ तीन मतांच्या फरकाने जिल्हा परिषदेत सत्ता काबीज केली. अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सत्तास्थापनेची लढत अत्यंत रंगतदार ठरणार हे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ गटांपैकी भाजपला २७ जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २०, शिवसेनेला १५, काँग्रेसला १, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ आणि एका अपक्ष सदस्याचा विजय झाला होता. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३३ जागांपासून भाजप दूर असतानाही अखेर भाजपने राजकीय समीकरणे आपल्या बाजूने फिरवली.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत भाजपच्या बाजूने ३३ सदस्यांनी हात उंचावत पाठिंबा दर्शवला, तर राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना ३० मते मिळाली. त्यामुळे अवघ्या तीन मतांच्या फरकाने भाजपने सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मान मिळवला.
सत्तास्थापनेच्या या प्रक्रियेपूर्वी जिल्हा परिषद परिसरात सकाळपासूनच मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजल्यापासूनच जिल्हा परिषद परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. सुमारे साडेअकराच्या सुमारास भाजपचे सदस्य ट्रॅव्हल्सने जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यानंतर सव्वा बाराच्या सुमारास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकत्रितपणे मतदानासाठी पोहोचले.
यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू झाली आणि सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले. अखेरीस ३३ विरुद्ध ३० अशा मतांनी भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे मनसुबे धुळीस मिळाले.
सातारा जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपने सत्ता मिळवली असून या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे या निकालातून स्पष्ट दिसत आहेत.


