मुंबई प्रतिनिधी
दिल्लीतील संसद मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांवर आरोप करायचा नाही; मात्र काहीजण स्वतःचा अजेंडा घेऊन आंदोलनात घुसल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काही राजकीय पक्ष आणि संघटना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, ‘‘लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत असलेली जबाबदारीही लक्षात घेतली पाहिजे. कोणी परवानगी घेऊन शांततेत आंदोलन करीत असेल, तर त्याला परवानगी दिली जाईल. मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी आंदोलन करणे किंवा हिंसाचार घडवून आणणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. अशा प्रकारांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल.’’
‘फेसलेस आंदोलनात काही प्रवृत्ती घुसतात’
आंदोलनाला ठोस नेतृत्व नसल्यास त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही घटकांकडून केला जातो, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘‘जेव्हा कोणतेही आंदोलन फेसलेस असते, तेव्हा काही प्रवृत्ती त्यात शिरतात. आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विषयाशी काहीही संबंध नसलेल्या संघटनाही आंदोलनात सहभागी होऊन अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी नेतृत्वहीन व्यवस्था निर्माण होते,’’ अशी टीका त्यांनी केली.
‘पोलिसांनी मोठा संयम दाखवला’
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनांची तोडफोड, वाहने उलटविणे आणि दगडफेकीसारखे प्रकार घडल्याचा दावा करीत फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. ‘‘कोणत्याही सरकारला नागरिकांवर लाठीचार्ज करणे आवडत नाही. मात्र आंदोलनाच्या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती पाहता पोलिसांनी नियंत्रण मिळवले नसते, तर अनेक अनावश्यक घटना घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम दाखवला. आंदोलन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी आवश्यक तेवढीच कारवाई करण्यात आली,’’ असे ते म्हणाले.
‘सर्व आंदोलकांवर आरोप नाही’
आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांवर आरोप करीत नसल्याचे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरणाच्या खोलात गेलो तर सर्व आंदोलकांवर आरोप करायचा नाही. काहीजण चांगल्या भावनेने आंदोलन करीत असतील. मात्र काहीजण असेही आहेत, ज्यांना या विषयाशी काही देणेघेणे नाही. त्यांना केवळ अराजकता निर्माण करायची आहे आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे.’’
‘‘आंदोलन करणाऱ्यांपैकी काहीजण प्रामाणिक भावनेने आलेले असू शकतात; मात्र काहीजण स्वतःचा अजेंडा घेऊन आंदोलनात शिरले आहेत. त्यातील अनेकांना नीट काय आहे किंवा परीक्षा कधी झाली, याचीही माहिती नसल्याचे दिसते. ते आपापला अजेंडा पुढे रेटत आहेत. यावरून या आंदोलनात एका विचाराने किंवा एका दिशेने चालणारे सर्वजण सहभागी झालेले नाहीत, हे स्पष्ट होते. काही राजकीय पक्षांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात जनतेने नाकारले आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला काही राजकीय लाभ मिळवता येईल का, याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे,’’ असा आरोपही फडणवीस यांनी केला.


