सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील वाटंबरे या छोट्याशा गावातील श्वेता सखाराम पवार हिने जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली असून सांगोला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या श्वेता पवारच्या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी दडलेली आहे. वाटंबरे गावातील शेतकरी कुटुंबातील सखाराम पवार यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुलांनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलींना उत्तम शिक्षण देण्याचा निर्धार केला.
श्वेताचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेत झाले. मात्र शिक्षणासाठी तिला रोज मोठा प्रवास करावा लागत होता. वाटंबरे गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील वस्तीवरून ती आणि तिची बहीण सायकलवर गावात येत असत. तेथून एसटी बसने सांगोला बसस्थानकावर उतरून सुमारे दोन किलोमीटर अंतर चालत त्या शाळेत पोहोचत. आठवी ते दहावी या तीन वर्षांच्या काळात तिने हा खडतर दिनक्रम कायम ठेवत शिक्षण घेतले.
याच काळात शाळेत तिला खेळांमध्येही आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. क्रीडाशिक्षक सचिन चव्हाण यांच्या नजरेत तिची क्रीडाक्षमता भरली. श्वेतामध्ये उत्कृष्ट बॉक्सर होण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांना वाटला. त्यांनी तिला बॉक्सिंग या क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्वेताने सातत्याने सराव करत जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय यश मिळवले.
पुढील शिक्षणासाठी तिने पिंपरी येथील जय हिंद कॉमर्स कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबरच बॉक्सिंगचा सरावही तिने सुरूच ठेवला.
२०१९ साली झालेल्या ७२ व्या विद्यापीठीय राष्ट्रीय स्पर्धेत तिने बॉक्सिंग प्रकारात कांस्यपदक पटकावले. विशेष म्हणजे त्या वर्षी पुणे विद्यापीठातून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणारी श्वेता पवार ही एकमेव खेळाडू ठरली होती. तिच्या या यशामुळे विद्यापीठासह जिल्ह्याचेही नाव उज्ज्वल झाले.
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्वेताने राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर एमपीएससीच्या २०२५ च्या परीक्षेत तिने महसूल सहाय्यक पद मिळवले. सध्या ती पुणे शहरातील उपनिबंधक कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी सरळ सेवा भरतीमधून तिला मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदाचीही संधी मिळाली होती.
याचबरोबर तिने एमपीएससीची तयारी सुरू ठेवत आणखी एक मोठे यश मिळवले. खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत तिने पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली. त्यामुळे एमपीएससीच्या माध्यमातून मिळालेले हे तिचे तिसरे यश ठरले आहे.
श्वेता पवारच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पी. सी. झपके यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनीही तिच्या यशाचा आनंद साजरा करत तिचे कौतुक केले.
या यशाबद्दल बोलताना श्वेता पवार म्हणाली, “गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांप्रमाणेच खेळाडूंनाही राखीव जागांच्या माध्यमातून उत्तम संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न पालकांना दाखवून द्यावेत आणि पालकांनी मुलांना योग्य संधी दिली तर यश नक्की मिळते.”
खडतर परिस्थितीतून पुढे येत शिक्षण, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षा या तिन्ही क्षेत्रात यश मिळवणाऱ्या श्वेता पवारने अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.


