ठाणे प्रतिनिधी
महिन्यांपासून रखडलेली ठाणे महापालिकेतील नोकरभरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेच्या ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील एकूण १ हजार ७७३ पदांसाठी तब्बल ७५ हजार अर्ज प्राप्त झाले असून, पुढील महिन्यापासून या भरती प्रक्रियेला पुन्हा गती देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून या भरतीकडे डोळे लावून बसलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
ठाणे महापालिकेत विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी ऑगस्ट २०२५ मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली होती. ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील एकूण १७७३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होताच राज्यभरातून उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडवली होती. विशेषतः आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागातील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले असल्याचे सांगितले जाते. याशिवाय लिपिक, तांत्रिक कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी अशा विविध पदांचाही या भरतीत समावेश आहे.
मात्र जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही काळातच ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाल्याने ही भरती प्रक्रिया अचानक थांबवण्यात आली. त्यातच भरती प्रक्रियेविरोधात काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याच्या चर्चेमुळेही प्रक्रिया अधिकच लांबली. परिणामी, अनेक महिन्यांपासून ही भरती रखडलेली होती. आता सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ही भरती सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी होणारी लेखी परीक्षा जिल्हानिहाय केंद्रांवर घेण्याची तयारी सुरू झाली आहे. उमेदवारांना अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये योग्य परीक्षा केंद्रांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यासोबतच ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित केली जातील, तेथे ठाणे महापालिकेच्या वतीने स्वतंत्र निरीक्षक नेमले जाणार आहेत. परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ही व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून तब्बल ७५ हजार इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक अर्जदाराकडून १ हजार ८०० रुपयांचे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेकडे राज्यातील बेरोजगार तरुणांचे विशेष लक्ष लागले आहे.
दीर्घकाळ रखडलेल्या या भरतीला आता गती मिळाल्याने ठाणे महापालिकेतील रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


