राहुरी प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे जाहीर केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या ३९ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहे. इंटरनॅशनल सोलर अलाईन्स यांनी महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ ही जगातील सर्वात मोठी वितरक सौर योजना असल्याची मान्यता दिली आहे. या योजनेतून सध्या सुमारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता उभी करण्यात आली आहे.
राज्यात शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती व वितरणाची प्रक्रिया सुरू असून या वर्षाअखेर सुमारे १४ हजार मेगावॅट वीज निर्मिती प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्या राज्यातील सुमारे ६५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा दिला जात आहे, तर काही भागात १० तास वीज दिली जाते. मात्र या वर्षाच्या अखेरीस उर्वरित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षापासून सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वातावरण बदलावर संशोधनाची गरज
हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या वातावरणाचा परिणाम कमी होईल अशी पिकांची वाण विकसित करणे, तसेच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीत AI तंत्रज्ञानाचा वापर वाढणार
राज्यातील सुमारे ७८ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित शेती पद्धती विकसित करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. राज्यातील १० हजार गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ शेती’चा प्रयोग सुरू असून कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे डिजिटायझेशन
राज्यातील सुमारे १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांचे डिजिटायझेशन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, AI तंत्रज्ञान आणि कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना परवडणारे व शाश्वत शेती मॉडेल तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
“केवळ कर्जमाफीवर उपाय नाही”
कर्जमाफी ही तात्पुरती दिलासा देणारी योजना असली तरी शेती क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि शिक्षण संस्थांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या या घोषणेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून दिवसा मोफत वीजपुरवठा मिळाल्यास सिंचन व्यवस्थेत सुधारणा होऊन शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


