राहुरी प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ तर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीदान समारंभात राज्यपाल व कुलपती विष्णू देवराम यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली. या सन्मानामुळे फडणवीस तिसऱ्यांदा ‘डॉक्टर’ झाले आहेत.
राहुरी येथे पार पडलेल्या या पदवीदान समारंभाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पदवी स्वीकारताना फडणवीस काय म्हणाले?
‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी स्वीकारताना फडणवीस म्हणाले की, “मला ही पदवी प्रदान केल्याबद्दल कुलपती आणि कुलगुरूंचे मनापासून आभार. पदवी स्वीकारावी की नाही, याबाबत सुरुवातीला संभ्रम होता. कारण कृषी क्षेत्रात अजून खूप समाधानकारक काम करायचे आहे. मात्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे नावाजलेले विद्यापीठ असल्याने हा सन्मान नाकारू शकलो नाही.”
शेतकऱ्यांना ‘वॉटर सिक्युरिटी’ आणि ‘एनर्जी सिक्युरिटी’ आवश्यक
कृषी क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी शेतीतील पाणी आणि ऊर्जेच्या उपलब्धतेवर विशेष भर दिला. ते म्हणाले, “शेती क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या दहा वर्षांत कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पूर्वी कृषीकडे मर्यादित दृष्टीकोनातून पाहिले जात होते; मात्र आता या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे.”
ते पुढे म्हणाले की, “जलयुक्त शिवारसारख्या योजनांमुळे राज्यातील भूजलपातळी वाढल्याचा केंद्र सरकारचा अहवाल आहे. शेतकऱ्यांना वॉटर सिक्युरिटीसोबत ऊर्जा सिक्युरिटी मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच सौरऊर्जेवर आधारित योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यावर्षाच्या अखेरीस राज्यात सुमारे १४ हजार मेगावॅट वीज निर्मिती होण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या ६५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळत आहे.”
शेतकऱ्यांचे डिजिटायझेशन करणारे महाराष्ट्र देशात अव्वल
हवामान बदल हा शेतीसमोरील मोठा धोका असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, “यंदाचे वर्ष ‘एल निनो’चे असल्याने पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलाचा शेती उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हवामानाचा परिणाम कमी होईल, अशी शेती पद्धती विकसित करणे आवश्यक आहे.”
ते म्हणाले की, “राज्यातील ७८ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. सुमारे १० हजार गावांमध्ये ‘क्लायमेट-प्रूफ’ शेतीची अंमलबजावणी सुरू आहे. कृषी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभारण्यावरही भर दिला जात आहे. राज्यातील १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.”
‘एआय’ तंत्रज्ञानाचा शेतीत वापर
फडणवीस यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याची गरजही अधोरेखित केली. “एआय समिटमध्ये महाराष्ट्राला शेतीविषयक स्वतंत्र विभाग देण्यात आला. कृषी विद्यापीठांच्या संशोधनासह एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना परवडणारे शेती मॉडेल विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले.
अजून मोठे परिवर्तन करायचे
कर्जमाफीसारखे निर्णय महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आर्थिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात मूलभूत बदल करणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आपल्याला अजून खूप मजल गाठायची आहे. शेती क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आणण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक बदल आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले.


