मुंबई प्रतिनिधी
मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरात आज शनिवारी दुपारी एका बांधकामाधीन इमारतीचा थरकाप उडवणारा अपघात घडला. सातव्या मजल्याचे काम सुरू असताना परांची कोसळून सहा मजूर खाली पडले. या दुर्घटनेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गंभीर दखल घेतली असून, निष्काळजीपणा करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष नगरमधील ‘आदित्य राज’ या विकासकामार्फत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुपारी मजुरांचे काम सुरू असताना अचानक आधार निकामी झाल्याने सहा जण उंचावरून खाली कोसळले. या अपघातात एकाचा जागीच प्राण गेला, तर अन्य पाच जणांना तातडीने उपचारासाठी घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले असून, इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी तातडीने दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, अशा सूचना महापौरांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौरांनी संताप व्यक्त केला. “या बांधकाम ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे प्रचंड उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने का पुरवण्यात आली नव्हती? काम सुरू असताना जबाबदार अभियंता तिथे उपस्थित होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर तातडीने कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी महानगरपालिका आणि म्हाडा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


