सुधाकर नाडर | रिपोर्टर
मुंबई: गुन्हेगारांचा छडा लावून चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून देण्यात मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपले कसब सिद्ध केले आहे. मुंबई पोलीस परिमंडळ ४ च्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ४ कोटी २६ लाख ३५ हजार २७ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आज एका विशेष कार्यक्रमात हा माल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला.

पाच वर्षांपासूनचे चोरीचे मोबाईल शोधले
पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली २० जानेवारी २०२६ पासून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत २०१९ ते २०२६ या कालावधीत चोरीला गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात आला. तपासाची चक्रे महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांपर्यंत फिरवून पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात ५६७ मोबाईल शोधून काढले, ज्याची किंमत साधारण १.२२ कोटी रुपये आहे.
दागिने आणि रोख रक्कमही जप्त
केवळ मोबाईलच नाही, तर परिमंडळ ४ मधील विविध पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या घरफोडी आणि चोरीच्या २४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत ३ कोटी ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या.

या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात यशस्वी मोहीम
पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का. व सु.) श्री. सत्यनारायण आणि अप्पर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. यामध्ये भोईवाडा, माटुंगा, सायन विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच काळाचौकी, र. अ. किडवाई मार्ग, ॲन्टॉप हिल आणि वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ९ अधिकारी व १५ अंमलदारांच्या पथकाने रात्रंदिवस मेहनत घेऊन हा मुद्देमाल शोधला.
आपला हरवलेला मौल्यवान ऐवज पुन्हा हातात पडल्याने नागरिकांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले असून, ‘मुंबई पोलीस सदैव तत्पर’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


